असहकार चळवळ
इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -7- Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१) गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात .......... या देशातून केली.
(अ) भारत
(ब) इंग्लंड
(क) दक्षिण आफ्रिका
(ड) म्यानमार
(क) दक्षिण आफ्रिका
(२) शेतकऱ्यांनी .......... जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली.
(अ) गोरखपूर
(ब) खेडा
(क) सोलापूर
(ड) अमरावती
(ब) खेडा
(३) जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या ..........
या किताबाचा त्याग केला.
(अ) लॉर्ड
(ब) सर
(क) रावबहादूर
(ड) रावसाहेब
(ब) सर
प्रश्न २. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयांवर १९०६ च्या आदेशान्वये कोणती बंधने घातली गेली ?
१९०६ मध्ये शासनाने कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे करून त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली.
(२) गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला ?
बिहारमधील चंपारण्य येथे (१९१७).
(३) जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी कोण होता ?
जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी जनरल डायर होता
प्रश्न ३. पुढील प्रश्नांची उत्तरे २५ ते ३० शब्दांत लिहा.
(१) सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान स्पष्ट करा.
सत्याग्रह म्हणजे सत्याचा व न्यायाचा ठाम आग्रह धरणे होय. अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयम व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्यायाची जाणीव करून देऊन तिचे मतपरिवर्तन करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट होते.
(२) स्वराज्य पक्षाची स्थापना का करण्यात आली ?
राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी ब्रिटिश सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली. याच मुख्य हेतूने त्यांनी १९२२ मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
प्रश्न ४. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) रौलट कायद्याला भारतीय जनतेने विरोध केला.
- पहिल्या महायुद्धानंतर भारतातील जनतेमध्ये वाढत्या किमती, वाढलेले कर यांमुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध तीव्र असंतोष पसरला होता.
- हा असंतोष दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारने सर सिडनी रौलट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून 'रौलट कायदा' मंजूर केला.
- या कायद्यान्वये कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी अटक करण्याचा आणि न्यायालयात खटला न भरता थेट तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला होता.
- तसेच या कायद्याने झालेल्या शिक्षेविरुद्ध न्यायालयात अपील करण्यासही मनाई करण्यात आली होती.
अशा प्रकारे भारतीयांचे मूलभूत हक्क हिरावून घेणाऱ्या या अन्यायकारक कायद्याला भारतीयांनी 'काळा कायदा' असे संबोधले आणि त्याला तीव्र विरोध केला.
(२) गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली.
- गांधीजींनी संपूर्ण देशात शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने असहकार चळवळ सुरू केली होती.
- परंतु, फेब्रुवारी १९२२ मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरीचौरा येथे शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला.
- या गोळीबारामुळे संतप्त झालेल्या जमावाने तेथील पोलीस चौकीला आग लावली.
- या आगीमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह २२ पोलीस जागीच जळून ठार झाले.
या हिंसक घटनेमुळे अहिंसेचे व्रत पाळणारे महात्मा गांधीजी अत्यंत व्यथित झाले आणि म्हणूनच त्यांनी १२ फेब्रुवारी १९२२ रोजी असहकार चळवळ स्थगित केली.
(३) भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला.
- १९१९ च्या माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायद्याने भारतीयांना दिलेल्या सुधारणा अत्यंत असमाधानकारक होत्या, ज्यामुळे जनतेत तीव्र असंतोष होता.
- या पार्श्वभूमीवर ब्रिटिश शासनाने सुधारणांचा अभ्यास करण्यासाठी १९२७ मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले.
- परंतु, या सात सदस्यीस असलेल्या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य समाविष्ट नव्हता.
- आपल्या देशाच्या भविष्याचा निर्णय घेणाऱ्या कमिशनमध्ये भारतीय प्रतिनिधी नसणे हा भारतीयांचा अपमान मानला गेला, म्हणूनच भारतातील सर्व राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
(४) भारतात खिलाफत चळवळ सुरू करण्यात आली.
- तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिम धर्मीयांचा 'खलिफा' म्हणजेच धर्मप्रमुख होता.
- पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात लढत होते. युद्धाच्या काळात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी युद्धानंतर खलिफाच्या साम्राज्याला कोणताही धक्का लावणार नाही, असे आश्वासन दिले होते.
- परंतु, युद्ध संपल्यानंतर इंग्लंडने आपले हे आश्वासन पाळले नाही, ज्यामुळे भारतीय मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली.
- या खलिफाला पाठिंबा देण्यासाठी आणि ब्रिटिशांचा निषेध करण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी भारतात जी चळवळ सुरू केली, तिलाच 'खिलाफत चळवळ' असे म्हणतात.
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -7-असहकार चळवळ – नोट्स
PDF : इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -7-असहकार चळवळ – स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Main Page : – Maharashtra Board इयत्ता आठवी- इतिहास व राज्यशास्त्र – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : धडा 6 : स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ – Online Solutions
Next Chapter : धडा 8 : सविनय कायदेभंग चळवळ – Online Solutions
