पाठ -10-सशस्त्र क्रांतिकारी चळवळ
इयत्ता-आठवी – इतिहास - Maharashtra Board
नोट्स
|
अभ्यासघटक :
|
सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचे मुख्य उद्दिष्ट :
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात सशस्त्र क्रांतिकारी चळवळीने अत्यंत मोलाचे योगदान दिले. इंग्रजांची अन्याय्य सत्ता उलथवून टाकणे, ब्रिटिश अधिकाऱ्यांचा दरारा नष्ट करणे आणि सैनिकांना उठावासाठी प्रेरित करणे ही या चळवळीची मुख्य उद्दिष्टे होती.
- ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध भारतात विविध मार्गांनी आंदोलने झाली, त्यांतील एक प्रमुख मार्ग म्हणजे सशस्त्र क्रांतीचा होता. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतरही देशाच्या विविध भागांत ब्रिटिशांविरुद्ध असंतोष धुमसत होता.
- रामसिंह कुका यांचा उठाव: १८५७ नंतरच्या काळात पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी सरकारविरोधी उठावाचे नियोजन केले होते.
- बिरसा मुंडा यांचा उठाव: बिहारमधील मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारविरुद्ध मोठा उठाव केला.
महाराष्ट्रातील प्रारंभिक सशस्त्र लढा :
वासुदेव बळवंत फडके (महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक):
- महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा वासुदेव बळवंत फडके यांनी दिला. ब्रिटिश सत्तेशी शस्त्राने लढले पाहिजे अशी त्यांची ठाम धारणा होती.
- त्यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडून शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले.
- ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी त्यांनी रामोशी बांधवांना संघटित करून बंड पुकारले.
- हे बंड अयशस्वी झाल्यावर ब्रिटिश सरकारने त्यांना एडनच्या कारागृहात ठेवले, तेथेच १८८३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
चापेकर बंधू व रँडचा वध (१८९७):
- सन १८९७ मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जुलूम-जबरदस्ती केली.
- याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण चापेकर बंधूंनी २२ जून १८९७ रोजी रँडचा वध केला.
- या प्रकरणात दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव हे तीन बंधू आणि त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशी देण्यात आली. एकाच घरातील तीन भावांनी देशासाठी हुतात्म्य पत्करले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व 'अभिनव भारत' :
मित्रमेळा ते अभिनव भारत:
- सन १९०० मध्ये स्वा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे 'मित्रमेळा' ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली.
- १९०४ मध्ये याच संघटनेला 'अभिनव भारत' असे नाव देण्यात आले.
लंडनहून मदत व वाङ्मय:
- उच्च शिक्षण घेण्यासाठी सावरकर इंग्लंडला गेले. तेथून त्यांनी अभिनव भारतच्या सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुल इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली.
- त्यांनी प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी यांचे स्फूर्तीदायी चरित्र लिहिले. तसेच १८५७ चा उठाव हे पहिले भारतीय स्वातंत्र्ययुद्ध होते, असे प्रतिपादन करणारा '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला.
जॅक्सनचा वध व ५० वर्षांची शिक्षा:
- सरकारने सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा दिली. याचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध केला.
- सरकारने या वधाचा संबंध स्वा. सावरकरांशी जोडून त्यांना अटक केली आणि ५० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावून अंदमानला पाठवले.
अंदमान, आत्मचरित्र व सामाजिक कार्य:
- सावरकरांनी अंदमानतील १० वर्षांच्या भयानक अनुभवांवर 'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र लिहिले.
- पुढे रत्नागिरीत स्थानबद्ध असताना त्यांनी जातिभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, सहभोजन व भाषाशुद्धी यांसारख्या सामाजिक चळवळी चालवल्या.
- ते थोर साहित्यिक असून १९३८ च्या मुंबईतील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
बंगालमधील क्रांतिकारी चळवळ (अनुशीलन समिती) :
अनुशीलन समितीची स्थापना:
- बंगालच्या फाळणीनंतर (१९०५) ब्रिटिशविरोधी असंतोष तीव्र झाला. बंगालमध्ये 'अनुशीलन समिती' ही गुप्त क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. या समितीच्या ५०० हून अधिक शाखा होत्या.
- अरविंद घोष यांचे बंधू बारींद्रकुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते. अरविंद घोष यांचे मार्गदर्शन या समितीला लाभले होते. कोलकत्त्याजवळील माणिकतळा येथे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते.
किंग्जफोर्डवर हल्ला व बलिदान:
- १९०८ मध्ये अनुशीलन समितीच्या खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी अत्याचारी न्यायाधीश किंग्जफोर्डला ठार मारण्याची योजना आखली. परंतु ज्या गाडीवर बॉम्ब टाकला ती किंग्जफोर्डची नव्हती, त्यामुळे गाडीतील दोन इंग्लिश स्त्रिया मारल्या गेल्या. प्र
- फुल्ल चाकी यांनी पोलिसांच्या हाती न लागता स्वतःवर गोळी झाडून हुतात्म्य पत्करले. खुदीराम बोस पोलिसांच्या हाती लागले व त्यांना फाशी देण्यात आली.
चळवळीचा विस्तार व इतर घटना:
- रासबिहारी बोस व सचिंद्रनाथ सन्याल यांनी क्रांतिकारी संघटनांचे जाळे बंगालबाहेर (पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश) विस्तारले.
- व्हॉइसरॉय लॉर्ड हॉर्डिंग्जवर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य रासबिहारी बोस व त्यांच्या सहकाऱ्याने केले.
- मद्रास प्रांतात वांची अय्यर यांनी ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार करून स्वतःवर गोळी झाडून आत्महुती दिली.
परदेशातील क्रांतिकारी कार्य व इंडिया हाऊस :
- इंडिया हाऊस (लंडन): लंडन येथील 'इंडिया हाऊस' हे परदेशातील मदतीचे मुख्य केंद्र होते. पं. श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय देशभक्ताने याची स्थापना केली होती. या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या दिल्या जात असत (स्वा. सावरकरांनाही अशी शिष्यवृत्ती मिळाली होती).
- मादाम कामा व राष्ट्रध्वज: मादाम कामा यांनी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला आणि भारताचा राष्ट्रध्वज फडकवला.
- मदनलाल धिंग्रा: इंडिया हाऊसशी निगडित मदनलाल धिंग्रा या तरुणाने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले, त्याबद्दल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली.
गदर चळवळ व आंतरराष्ट्रीय प्रयत्न :
- गदर संघटनेची स्थापना: पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी 'गदर' या संघटनेची स्थापना केली. लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे हे प्रमुख नेते होते. 'गदर' या मुखपत्रातून राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांतीचा संदेश दिला जाई.
- पंजाबमधील उठाव योजना: गदर नेत्यांनी महायुद्धाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन पंजाबमध्ये सैनिकांच्या मदतीने उठाव आखला. रासबिहारी बोस व विष्णु गणेश पिंगळे यांनी नेतृत्व केले. परंतु फितुरीमुळे ब्रिटिशांना सुगावा लागला, पिंगळे पकडले जाऊन त्यांना फाशी झाली; रासबिहारी बोस जपानला निसटले.
- इतर आंतरराष्ट्रीय प्रयत्न: बर्लिनमध्ये वीरेन चटोपाध्याय, भूपेन दत्त व लाला हरदयाळ यांनी जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिशविरोधी योजना आखल्या. १९१५ मध्ये महेंद्रप्रताप, बरकतुल्रा व ओबीदुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची (Provisional Government) स्थापना केली होती.
काकोरी कट (९ ऑगस्ट १९२५)
- गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केल्यानंतर अनेक तरुण पुन्हा क्रांतीमार्गाकडे वळले.
- चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चॅटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल इत्यादी क्रांतिकारक एकत्र आले.
- क्रांतिकारी कार्यासाठी लागणारा पैसा जमवण्यासाठी त्यांनी ९ ऑगस्ट १९२५ रोजी उत्तर प्रदेशातील काकोरी रेल्वे स्टेशनजवळ सरकारी खजिना लुटला. यालाच 'काकोरी कट' म्हणतात.
- सरकारने तात्काळ कारवाई करून अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग व राजेंद्र लाहिरी यांना फाशी दिली. चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले नाहीत.
हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) :
स्थापना व विचारसरणी (१९२८):
- १९२८ मध्ये दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी HSRA ची स्थापना केली.
- भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे आणि शेतकरी-कामगारांचे शोषण थांबवणारी समाजवादी, धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्था निर्माण करणे हे तिचे उद्दिष्ट होते.
- या संघटनेच्या लष्करी विभागाचे नाव 'हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी' होते व त्याचे प्रमुख चंद्रशेखर आझाद होते.
साँडर्सचा वध:
- लाला लजपतराय यांच्या लाठीहल्ल्यातील मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग व राजगुरू यांनी साँडर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या झाडून ठार केले.
मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्बस्फोट:
- नागरी हक्कांची पायामल्ली करणाऱ्या दोन विधेयकांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेशवर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात (Central Legislative Assembly) बॉम्ब फेकले व आत्मसमर्पण केले.
फाशी व आझादांचे हुतात्म्य:
- राजद्रोहाच्या आरोपाखाली २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
- चंद्रशेखर आझाद अल्लाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले.
चितगाव शस्त्रागारावरील हल्ला व महिला क्रांतिकारकांचे योगदान :
चितगाव हल्ला (१८ एप्रिल १९३०):
- सूर्यसेन ('मास्तरदा') यांनी अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतीलता वड्डेदार यांच्यासह १८ एप्रिल १९३० रोजी चितगाव येथील दोन शस्त्रागारांवर हल्ला करून शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. टेलिफोन व टेलिग्राम संदेशवहन ठप्प केले.
- १६ फेब्रुवारी १९३३ रोजी सूर्यसेन पकडले गेले व त्यांना फाशी झाली. प्रीतीलता वड्डेदार यांनी पोलिसांच्या हाती न लागता आत्महुती दिली, तर कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली.
स्त्री क्रांतिकारकांचे योगदान:
- शांती घोष व सुनीती चौधरी या दोन शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले, तर बीना दास या युवतीने कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
उधमसिंग यांचा सूड (१९४०):
- जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या मायकेल ओड्वायर याचा वध सरदार उधमसिंग यांनी १९४० मध्ये इंग्लंडमध्ये केला.
क्रांतिकारकांचे योगदान :
- भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांशी लढताना साहस व निर्धार यांचे दर्शन घडवले.
- क्रांतिकारकांचे राष्ट्रप्रेम व समर्पण वृत्ती भारतीयांना स्फूर्तिदायी ठरली.
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -10-सशस्त्र क्रांतिकारी चळवळ – नोट्स
PDF : इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -10-सशस्त्र क्रांतिकारी चळवळ – स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Main Page : – Maharashtra Board इयत्ता आठवी- इतिहास व राज्यशास्त्र – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : धडा 9 : स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व – Online Notes
Next Chapter : धडा 11 : समतेचा लढा – Online Notes
