पाठ -11-समतेचा लढा
इयत्ता-आठवी – इतिहास - Maharashtra Board
नोट्स
|
अभ्यासघटक :
|
समतेच्या लढ्याची पार्श्वभूमी व महत्त्व :
- आधुनिक भारताच्या जडणघडणीत राजकीय स्वातंत्र्याचा लढा जितका महत्त्वाचा होता, तितकाच समतेचा लढाही अत्यंत मोलाचा ठरला.
- भारताचा स्वातंत्र्यलढा केवळ ब्रिटिशांविरुद्ध नव्हता, तर तो सरंजामशाही, सामाजिक विषमता आणि आर्थिक शोषण यांविरुद्ध लढला गेलेला एक व्यापक 'समतेचा लढा' होता. हा लढा मानवमुक्तीच्या व्यापक तत्त्वज्ञानावर आधारित होता.
- स्वातंत्र्याप्रमाणेच 'समता' हे तत्त्व मानवी प्रगतीसाठी अनिवार्य मानले गेले.
- या दृष्टीने शेतकरी, कामगार, स्त्रिया आणि दलित या शोषित समाजघटकाकांनी उभारलेले लढे आणि समतेला प्राधान्य देणारा समाजवादी प्रवाह यांचे योगदान अद्वितिय आहे.
| 💡 प्रकरणाचा गाभा : समतेच्या लढ्याने भारतीय समाजाला केवळ राजकीयदृष्ट्याच नव्हे, तर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या प्रगल्भ बनवले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही आधुनिक भारताची चतुःसूत्री या चळवळींमधूनच दृढ झाली. |
शेतकरी चळवळ (Farmers' Movement) :
ब्रिटिश राजवटीतील शोषणात्मक आर्थिक धोरणे: ब्रिटिशांच्या शेतसारा वसुलीच्या जाचक पद्धतींमुळे भारतातील शेतकरी कंगाल झाला. ब्रिटिश सरकार जमीनदार व सावकारांना संरक्षण देत असे, जे शेतकऱ्यांवर अन्याय व अत्याचार करत असत.
प्रमुख शेतकरी उठव व लढे:
नीळ उत्पादक शेतकऱ्यांचा उठाव (बंगाल):
- बंगालमध्ये नीळ उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी संघटना स्थापन करून सक्तीच्या नीळ लागवडीविरुद्ध मोठा उठाव केला.
- दीनबंधू मित्र यांच्या 'नीलदर्पण' या नाटकाने या शेतकऱ्यांची हालकीची स्थिती संपूर्ण समाजाच्या निदर्शनास आणून दिली.
महाराष्ट्रातील दख्खनचे दंगे (१८७५):
- १८७५ मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकारांच्या अत्याचारांविरुद्ध तीव्र उठाव केला.
उत्तर प्रदेशातील 'किसान सभा' (१९१८):
- बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने १९१८ मध्ये उत्तर प्रदेशात किसान सभेची स्थापना झाली.
मोपला उठाव (केरळ):
- केरळमधील मोपला शेतकऱ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आणि जमीनदारांविरुद्ध मोठा उठाव केला, जो ब्रिटिशांनी दडपून टाकला.
अखिल भारतीय किसान सभा (१९३६):
- प्रा. एन. जी. रंगा यांच्या पुढाकाराने १९३६ मध्ये 'अखिल भारतीय किसान सभा' स्थापन झाली. स्वामी सहजानंद सरस्वती हे या सभेचे अध्यक्ष होते.
- या सभेने शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला (काँग्रेसला) सादर केला.
- १९३६ च्या फैजपूर ग्रामीण अधिवेशनात हजारो शेतकरी उपस्थित होते.
साने गुरुजींचे योगदान:
- १९३८ मध्ये पूर्व खानदेशात अतिवृष्टीमुळे पिके बुडाली असता, शेतसारा माफ करण्यासाठी साने गुरुजींनी ठिकठिकाणी सभा, मिरवणुका व कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले.
- त्यांनी धुळे-अमळनेर येथे किसान-कामगारांची प्रबळ एकजुट बांधली आणि पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून आमरण उपोषण केले.
कामगार संघटना व चळवळ (Workers' Movement) :
कामगार चळवळीचा उदय: १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या आणि खाणी यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली. त्यातून कामगार वर्ग अस्तित्वात आला आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले.
प्रमुख कामगार नेते व संघटना:
नारायण मेघाजी लोखंडे (भारतीय कामगार चळवळीचे जनक):
- १८९० मध्ये त्यांनी 'बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन' या गिरणी कामगार संघटनेची स्थापना केली. ही भारतातील पहिली संघटित कामगार संघटना मानली जाते.
- त्यांनी १० जून १८९० पासून कामगारांना रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळवून दिली.
- ते महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते.
प्रमुख संप व लढे:
- १८९९ मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुला (G.I.P.) रेल्वे कामगारांनी संप पुकारला.
- वंगभंग आंदोलनादरम्यान स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले.
- १९२८ मध्ये मुंबईतील गिरणी कामगारांनी ६ महिने ऐतिहासिक संप केला.
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस - आयटक (AITUC - १९२०):
- पहिल्या महायुद्धानंतर औद्योगिकीकरणामुळे राष्ट्रव्यापी संघटनेची गरज भासू लागली.
- १९२० मध्ये 'आयटक'ची स्थापना झाली. ना. म. जोशी यांचा यात मोठा वाटा होता.
- लाला लजपतराय हे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.
समाजवादी व साम्यवादी चळवळ (Socialist & Communist Movements) :
साम्यवादी चळवळ :
- कार्ल मार्क्स आणि रशियन क्रांतीच्या प्रभावातून भारतात साम्यवादी विचारांचा प्रसार झाला.
- लोकमान्य टिळकांनी १८८१ मध्येच मार्क्सवर लेख लिहिला होता.
- मानवेंद्रनाथ रॉय यांनी आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत कार्य केले.
- १९२५ मध्ये भारतात 'भारतीय साम्यवादी पक्ष' स्थापन झाला. श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद इत्यादी नेत्यांनी कामगार व शेतकऱ्यांच्या लढे उभारले.
मीरठ कट खटला:
- साम्यवादी चळवळीचा वाढता प्रभाव पाहून सरकारने श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव नीळकंठ जोगळेकर इत्यादींना अटक करून त्यांच्यावर ब्रिटिश राजवट उलटवून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवला. हा खटला मीरठ येथे चालवला गेला.
समाजवादी पक्ष (Congress Socialist Party - 1934):
- राष्ट्रीय सभेतील तरुण कार्यकर्त्यांना आर्थिक व सामाजिक समतेच्या तत्त्वावर समाजाची पुनर्रचना करण्याची गरज वाटली. नाशिकच्या तुरुंगात असताना त्यांनी समाजवादी पक्ष स्थापनेचा निर्णय घेतला.
- १९३४ मध्ये 'काँग्रेस समाजवादी पक्ष' स्थापन झाला. प्रमुख नेते: आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मिनू मसानी, डॉ. राममनोहर लोहिया. १९४२ च्या 'छोडो भारत' आंदोलनात हे तरुण अग्रभागी होते.
स्त्रियांची चळवळ (Women's Movement) :
सुधारणा व संस्थात्मक कार्य:
पंडिता रमाबाई: 'आर्य महिला समाज' आणि 'शारदासदन' या संस्था स्थापन करून अनाथ व स्त्रियांच्या पुनर्वसनाचे कार्य केले.
रमाबाई रानडे: 'सेवासदन' संस्थेची स्थापना करून महिलांच्या शिक्षणासाठी व आरोग्यासाठी कार्य केले.
राष्ट्रीय संस्था:
- 'भारत महिला परिषद' (१९०४) व 'ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स' (१९२७) यामुळे स्त्री चळवळ राष्ट्रीय पातळीवर पोहोचली.
- स्त्रियांनी वारसा हक्क, मतदानाचा हक्क यांसाठी लढा दिला.
वैद्यकीय क्षेत्रातील महिला अग्रदूत:
- डॉ. आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर (मार्च १८८६ M.D. पदवी).
- डॉ. रखमाबाई सावे यांनी वैद्यकीय सेवा दिली व राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची शाखा उघडली.
| 👩⚕️ डॉ. आनंदीबाई जोशी — पहिल्या भारतीय महिला डॉक्टर
· मुलगा १० दिवसांचा असताना मृत्यू पावला — याच खंतीने त्यांना वैद्यकीय शिक्षणाकडे वळवले. · मार्च १८८६ मध्ये त्यांनी एम.डी. ही पदवी घेतली. · भारतात परतताना क्षयरोग झाला; १६ फेब्रुवारी १८८७ रोजी पुण्यात निधन. |
दलित चळवळ (Dalit Movement)
सुरुवातीचे समाजसुधारक:
- महात्मा जोतीराव फुले आणि नारायण गुरू यांनी जनजागृती केली.
- गोपाळबाबा वलंगकर यांनी 'विटाळ विध्वंसन' (१८८८) पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले.
- शिवराम जानबा कांबळे यांनी 'सोमवंशीय मित्र' (१९०८) मासिक सुरू केले.
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: १९०६ मध्ये 'डिप्रेश्ड क्लासेस मिशन' सुरू केले. मुंबईत परळ, देवणार येथे शाळा उघडल्या. पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह आयोजित केला.
- राजर्षी शाहू महाराज: कोल्हापूर संस्थान आरक्षणाचा जाहीरनामा काढला, मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण दिले, २२ फेब्रुवारी १९१८ रोजी गॅझेटद्वारे 'बलुतेदारी पद्धती' नष्ट केली, आंतरजातीय विवाहास मान्यता दिली आणि व्यवसाय स्वातंत्र्य दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे युगप्रवर्तक नेतृत्व:
- ध्येयवाक्य: स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांवर समाजाची उभारणी. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा संदेश.
- बहिष्कृत हितकारिणी सभा (जुलै १९२४): दलित समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्थापना.
- सत्याग्रह: २० मार्च १९२७ रोजी महाड येथील 'चवदार तळ्याचा सत्याग्रह' आणि विषमतावादी मनुस्मृतीचे दहन. १९३० मध्ये नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (नेतृत्व: कर्मवीर दादासाहेब गायकवाड).
- वृत्तपत्रे: 'मूकनायक', 'बहिष्कृत भारत', 'जनता', 'समता'.
- राजकीय कार्य व धर्मसंस्थापना: 'स्वतंत्र मजूर पक्ष' आणि १९४२ मध्ये 'शेड्युल्ड कास्ट फेडरेशन'ची स्थापना. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून संविधानात समतेची तत्त्वे समाविष्ट केली. १९५६ मध्ये नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -11-समतेचा लढा – नोट्स
PDF : इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -11-समतेचा लढा – स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Main Page : – Maharashtra Board इयत्ता आठवी- इतिहास व राज्यशास्त्र – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : धडा 10 : सशस्त्र क्रांतिकारी चळवळ – Online Notes
Next Chapter : धडा 12 : स्वातंत्र्यप्राप्ती – Online Notes
