प्रश्न १. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय नि वडून विधाने पुन्हा लिहा.
(१) भारत सेवक समाजाची स्थापना .......... यांनी केली.
(अ) गणेश वासुदेव जोशी
(ब) भाऊ दाजी लाड
(क) म.गो.रानडे
(ड) गोपाळ कृष्ण गोखले
(२) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन .......... येथे भरवण्यात आले.
(अ) पुणे
(ब) मुंबई
(क) कोलकाता
(ड) लखनौ
(३) गीतारहस्य हा ग्रंथ .......... यांनी लिहिला.
(अ) लोकमान्य टिळक
(ब) दादाभाई नौरोजी
(क) लाला लजपतराय_
(ड) बिपीनचंद्र पाल
(ब) नावे लि हा.
(१) मवाळ नेते .............. ..............
(२) जहाल नेते .............. ..............
उत्तर :
- मवाळ नेते — गोखले, फिरोजशहा मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी
- जहाल नेते — लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल
प्रश्न २. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली.
उत्तर :
स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत होण्याची कारणे:
- प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि हस्तलिखितांच्या अभ्यासामुळे भारताचा समृद्ध वारसा लोकांसमोर आला.
- डॉ. भाऊ दाजी लाड व डॉ. रा.गो. भांडारकर यांसारख्या विद्वानांच्या संशोधनामुळे भारतीयांमध्ये स्वाभिमान जागृत झाला.
- पाश्चात्य शिक्षणामुळे स्वातंत्र्य, समता, लोकशाही आणि राष्ट्रवादाची जाणीव निर्माण झाली.
- याच काळात सुरू झालेल्या वृत्तपत्रांतून राजकीय आणि सामाजिक जागृती होऊ लागली, ज्याचा परिणाम लोकांची अस्मिता जागृत होण्यावर झाला.
(२) भारतीय राष्ट्रीय सभेत दोन गट तयार झाले.
उत्तर :
भारतीय राष्ट्रीय सभेत दोन गट तयार होण्याची कारणे:
- कार्यपद्धतीबाबत नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले.
- मवाळ नेते शांततामय व सनदशीर मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याच्या बाजूचे होते. (गोपाळ कृष्ण गोखले, फिरोजशहा मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी)
- जहाल नेते तीव्र संघर्ष आणि आंदोलनाद्वारे स्वातंत्र्य मिळवण्यावर भर देत होते. (लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल)
- १९०७ च्या सुरत अधिवेशनात स्वदेशी व बहिष्काराच्या प्रश्नावर मतभेद वाढल्याने भारतीय राष्ट्रीय सभेत मवाळ व जहाल असे दोन गट पडले.
(३) लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले.
उत्तर :
लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करण्याचे ठरवले त्यामागची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- बंगाल हा एक मोठा प्रांत होता, त्यामुळे या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड आहे, असे कारण लॉर्ड कर्झनने पुढे केले.
- हिंदू आणि मुस्लीम समाजात दुहीचे बीज पेरून ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंब करणे हा ब्रिटिशांचा खरा उद्देश होता.
- फाळणीमुळे मुस्लीम बहुसंख्याकांचा 'पूर्व बंगाल' आणि हिंदू बहुसंख्याकांचा 'पश्चिम बंगाल' अशी रचना करण्यात आली. यातून हिंदू-मुस्लिमांत फूट पाडून सुरू असलेली स्वातंत्र्य चळवळ दुबळी करणे हा लॉर्ड कर्झनचा छुपारा हेतू होता.
प्रश्न ३. टीपा लिहा.
(१) राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे
उत्तर :
२८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले आणि या अखिल भारतीय संघटनेची स्थापना झाली.
या सभेची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली होती:
- भारतातील सर्व धर्म, जात, भाषा व प्रदेशांतील लोकांना एकत्र आणणे.
- भारतीयांच्या समस्यांवर विचारविनिमय करून उपाय शोधणे.
- देशात ऐक्यभावना वाढवणे.
- भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करणे.
- सनदशीर मार्गाने ब्रिटिश सरकारकडे मागण्या मांडून भारतीयांच्या हक्कांसाठी कार्य करणे.
- मवाळ कालखंडात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात आणि लष्करी खर्चात कपात व्हावी, अशा मागण्यांचे ठरावही मांडण्यात आले.
(२) वंगभंग चळवळ
उत्तर :
लॉर्ड कर्झनने १९०५ मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केल्यानंतर, या अन्यायी निर्णयाविरुद्ध जी व्यापक लोकचळवळ उभी राहिली, तिला 'वंगभंग चळवळ' असे म्हणतात.
- १६ ऑक्टोबर १९०५ हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोकदिन म्हणून पाळण्यात आला.
- 'वंदे मातरम्' गीत, रक्षाबंधन आणि निषेध सभांद्वारे ऐक्य व्यक्त करण्यात आले.
- या चळवळीत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा व महाविद्यालयांवर बहिष्कार टाकला.
- सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस आणि रवींद्रनाथ टागोर यांनी चळवळीचे नेतृत्व केले.
- वंगभंग चळवळीमुळे भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली आणि ती एक खऱ्या अर्थाने राष्ट्रीय चळवळ बनली.
- या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या असंतोषाची तीव्रता पाहून अखेर १९११ साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली.
वंगभंग चळवळीने भारतीयांमध्ये प्रखर राष्ट्रवाद आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण केली.
(३) राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री
उत्तर :
१९०६ च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 'स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार' ही चतुःसूत्री एकमताने स्वीकारण्यात आली. या चतुःसूत्रीचे स्वरूप खालीलप्रमाणे होते:
- स्वराज्य: १९०६ च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी यांनी भारतीयांनी एकजूट करून स्वराज्याचे ध्येय साध्य करावे, असा संदेश त्यांनी दिला.
- स्वदेशी: स्वदेशीच्या मार्गाने गेल्यामुळे आपण स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होऊ, असा विश्वास नेत्यांना होता. देशातील वस्तू, उद्योग आणि साधनांचा वापर करून स्वावलंबन साधणे हा याचा उद्देश होता.
- राष्ट्रीय शिक्षण: देशप्रेम, भाषा आणि संस्कृतीची जाणीव असलेली पिढी घडवण्यासाठी राष्ट्रीय शिक्षणावर भर देण्यात आला.
- बहिष्कार: परदेशी माल आणि वस्तूंवर बहिष्कार टाकणे ही पहिली पायरी, तर परदेशी राजवटीवर बहिष्कार टाकणे ही पुढची पायरी असे ठरवण्यात आले.
प्रश्न ४. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.
- प्रशासकीय केंद्रीकरण
- आर्थिक शोषण
- पाश्चात्त्य शिक्षण
- भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास
- वृत्तपत्रांचे कार्य
उत्तर :
- प्रशासकीय केंद्रीकरण: ब्रिटिशांनी भारतात एकसमान प्रशासन व्यवस्था निर्माण केली. रेल्वे, टपाल आणि रस्ते यांमुळे विविध प्रांतांतील लोकांचा परस्पर संपर्क वाढला आणि राष्ट्रभावना विकसित झाली.
- आर्थिक शोषण: ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारताची संपत्ती इंग्लंडला जात होती. शेतकऱ्यांवरील करांचा बोजा, उद्योगधंद्यांचा ऱ्हास आणि वाढती बेकारी यांमुळे जनतेत असंतोष निर्माण झाला.
- पाश्चात्त्य शिक्षणाचा प्रभाव: इंग्रजी शिक्षणामुळे भारतीयांना स्वातंत्र्य, समता, लोकशाही आणि राष्ट्रवाद यांसारख्या आधुनिक विचारांची ओळख झाली. त्यामुळे भारतीयांमध्ये राजकीय जागृती निर्माण झाली.
- प्राचीन इतिहासाचा अभ्यास: भारतीय आणि पाश्चात्त्य विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करून तिचा गौरवशाली वारसा जगासमोर आणला. यामुळे भारतीयांचा स्वाभिमान आणि अस्मिता जागृत झाली.
- वृत्तपत्रांचे कार्य: इंग्रजी व प्रादेशिक भाषांतील वृत्तपत्रांनी राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर जनजागृती केली. त्यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांवर टीका करून लोकमत तयार केले.
या सर्व कारणांमुळे भारतीयांमध्ये राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण झाली आणि देशाच्या हितासाठी कार्य करणारी अखिल भारतीय संघटना म्हणून भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना १८८५ मध्ये झाली.