वृष्टी
इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-५-महाराष्ट्र बोर्ड
नोट्स
|
अभ्यासघटक :
|
पृथ्वीवरील जलसाठे व जलाविष्कार :
- पृथ्वीचा ७०.८ टक्के पृष्ठभाग जलयुक्त आहे. हे जलसाठे काही ठिकाणी मर्यादित, तर काही ठिकाणी मुबलक आहेत.
- वातावरणातील बाष्प आणि हवामानात होणारे बदल यांमुळे पृथ्वीवर विविध जलाविष्कार घडत असतात.
- दव पडणे, हिमवृष्टी, पाऊस, धुके, गारा हे काही प्रमुख जलाविष्कार आहेत.
वृष्टी :
- आकाशातून किंवा ढगातून जमिनीकडे पाण्याचा द्रवरूपात किंवा घनरूपात होणारा वर्षाव, म्हणजे 'वृष्टी' होय.
- दव, दहिवर, हिम, पाऊस, धुके, गारा ही वृष्टीची रूपे आहेत.
हिम :
- संप्लवन : बाष्पाचे वायुरूपातून थेट स्थायुरूपात रूपांतर होण्याच्या क्रियेला 'संप्लवन' म्हणतात.
- हवेचे तापमान जेव्हा गोठनबिंदूच्या खाली जाते, तेव्हा हवेतील बाष्पाचे संप्लवन क्रियेमुळे थेट हिमकणांत रूपांतर होते.
- पाण्याच्या अशा घनरूपी वृष्टीला 'हिमवृष्टी' म्हणतात.
हिम आणि हिमवृष्टीची वैशिष्ट्चे :
- हिम - घनरूपात असते, थरावर थर जमतात.
- हिम - भुसभुशीत व अपारदर्शक असते,
- हिम वितळल्यावर त्यापासून प्रदेशाला पाणी मिळते.
- हिमवृष्टी - उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात सर्वत्र होते.
- समशीतोष्ण कटिबंधात समुद्रसपाटीपर्यंत होते.
- उष्ण कटिबंधात ५००० मीटरपेक्षा जास्त उंचावरील प्रदेशात होते.
- हिमवृष्टीच्या प्रदेशात लोकांना हिमदाह होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते.
हिमवृष्टी प्रदेशासाठी बहुतांशी लाभदायकच असते; कारण हिमवृष्टी हाच त्या प्रदेशासाठी जलस्रोत असतो.
अतिहिमवृष्टी झाली, तर काही प्रमाणात जीवित व वित्तहानी होते, वाहतूक, संदेशवहन सेवा कोलमडते.
| माहीती साठी :
· हिम व बर्फ यांत फरक असतो. · हिम भुसभुशीत व अपारदर्शक असते. · हिमांचे थरावर थर साचल्याने दाबामुळे एकसंध, भरीव व पारदर्शक बर्फ बनतो. · काही प्रदेशात तापमान गोठणबिंदूच्या खाली गेल्यास जलाशयावर बर्फाचे थर तयार होतात. या बर्फाचा हिमवृष्टीशी संबंध नसतो. |
गारा :
- भूपृष्ठावर खूप उष्णता असली की हवा वरच्या बाजूला (ऊर्ध्वगामी) जोराने जाते. ही हवा वर गेल्यावर थंड होते आणि तिच्यातील वाफ थेंबांमध्ये बदलते. त्यातून काळसर ढग तयार होतात.
- वर गेलेल्या पाण्याचे थेंब थंडीत घट्ट होऊन गार होतात. गार जड असल्यामुळे त्या खाली पडू लागतात, पण वर जाणाऱ्या हवेच्या जोरामुळे पुन्हा वर जातात. तेथे त्यांच्यावर बर्फाचे नवे थर (समकेंद्री थर) चढतात.
- असे वारंवार झाल्याने गारा मोठ्या होत जातात आणि शेवटी गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीवर जोरात पडतात. यालाच गारपीट म्हणतात.
- समकेंद्री थर : गारा तयार होताना त्या वातावरणात सतत वर-खाली होत असतात. जास्त उंचीवर या गारांवर बर्फाचे थरावर थर जमतात व गार मोठी होत जाते. गारेतील या थरांना 'समकेंद्री थर' म्हणतात.
- गारपिटीमुळे पिकांचे खूप नुकसान होते, जीवित व वित्तहानीदेखील होते.
- विषुववृत्तावर गारा पडत नाहीत, कारण वातावरणात खूप जास्त उष्णता असते.
- शीत कटिबंधात गारा पडत नाहीत, कारण तेथे हवेचे ऊर्ध्वगामी प्रवाह नसतात.
- भारत, आफ्रिका, आग्नेय आशिया अशा उष्ण कटिबंधातील प्रदेशांत उन्हाळ्यात गारा पडतात.
पाऊस (पर्जन्य) :
पावसाचे तीन प्रकार :
- आरोह किंवा अभिसरण पाऊस.
- प्रतिरोध पाऊस.
- आवर्त पाऊस.
आरोह किंवा अभिसरण पाऊस :
विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर सूर्यकिरणे सरळ (लंबरूप) पडतात. त्यामुळे:
- जमिनीचे तापमान जास्त होते
- हवा गरम होते आणि वर जाते
- वर थंड वातावरणात ही हवा थंड होते
- थंड हवेत वाफेचे सांद्रीभवन होते
- जलकण तयार होतात आणि पाऊस पडतो
यालाच आरोह किंवा अभिसरण पाऊस म्हणतात.
दुपारीच पाऊस का पडतो? : जमिन जलद तापते, त्यामुळे दुपारपर्यंत ती खूप गरम होते. गरम हवेमुळे अभिसरण क्रिया होते आणि दुपारनंतर पाऊस पडतो
समुद्राचे पाणी हळूहळू तापते, त्यामुळे: दुपारपर्यंत अभिसरण क्रिया होत नाही म्हणून समुद्रावर दुपारी पाऊस पडत नाही
आरोह किंवा अभिसरण पावसाची वैशिष्ट्ये:
- रोज दुपारी विषुववृत्तीय प्रदेशात पाऊस पडतो
- ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होतो
- अमेझॉन (दक्षिण अमेरिका) आणि कांगो खोरे (आफ्रिका) हे आरोह पावसाचे प्रमुख प्रदेश
- पाऊस स्थानिक असतो आणि मर्यादित क्षेत्रात पडतो
- पावसाची निश्चितता जास्त असते
प्रतिरोध पाऊस :
- जेव्हा समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे पर्वताला अडतात
- ते वारे पर्वताच्या दिशेने वर चढतात
- वर थंड हवेमुळे वाफेचे सांद्रीभवन होते
- आणि पाऊस पडतो
या प्रकारच्या पावसाला प्रतिरोध पाऊस म्हणतात.

प्रतिरोध पावसाची वैशिष्ट्ये:
- पर्वतरांगांच्या अडथळ्यामुळे हा पाऊस पडतो
- पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पाऊस पडतो
- तर विरुद्ध बाजूवर पर्जन्यछाया म्हणजेच कमी पाऊस असतो
- भारतातला मान्सून पाऊस हा प्रतिरोध पावसाचा प्रकार आहे
- या पावसाची निश्चितता कमी असते
- कधी अतिवृष्टी होते
- तर कधी अवर्षण
- जगात सर्वाधिक भागात प्रतिरोध पाऊस पडतो
पर्जन्यछायेचा प्रदेश :
- समुद्र किंवा जलाशयावरून बाष्पयुक्त वारे पर्वताच्या दिशेने येतात.
- हे वारे पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर अडतात आणि वर चढतात.
- वर थंड हवेमुळे वाफेचे सांद्रीभवन होते आणि पाऊस पडतो.
- वारे पर्वतमाथा ओलांडून विरुद्ध बाजूला जातात, तेव्हा ते कोरडे होतात.
- त्यामुळे पर्वताच्या दुसऱ्या बाजूला पावसाचे प्रमाण कमी असते.
- कमी पावसाच्या या भागाला पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतात.

मुख्य वैशिष्ट्ये:
- पर्जन्यछाया म्हणजे पर्वताच्या विरुद्ध बाजूचा कोरडा भाग
- वाऱ्याकडील बाजूवर जास्त पाऊस, विरुद्ध बाजूवर कमी पाऊस
- हा प्रकार प्रतिरोध पावसामुळे निर्माण होतो
- अशा प्रदेशात शुष्क हवामान आणि अवर्षणाची शक्यता जास्त असते
महाराष्ट्रातील पर्जन्यछायेचा प्रदेश.

- अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात येतात.
- हे वारे सह्याद्री पर्वताला अडतात व वर जातात.
- वर गेल्यावर वाफ थंड होऊन ढग तयार होतात व कोकण व सह्याद्रीच्या पश्चिमेस भरपूर पाऊस पडतो.
- सह्याद्री ओलांडून पठाराकडे गेलेले वारे कोरडे होतात. त्यामुळे सह्याद्रीच्या पूर्वेला (पठार भागात) म्हणजेच पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडतो.
- या कमी पावसाच्या भागाला पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतात.
थोडक्यात, महाराष्ट्रात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
आवर्त पाऊस :
एखाद्या ठिकाणी हवेचा दाब खूप कमी असतो त्यामुळे आजूबाजूच्या जास्त दाबाच्या प्रदेशातून हवा त्या ठिकाणी येते ही हवा चक्राकार गतीने फिरत येते — यालाच आवर्त म्हणतात
चक्राकार गतीमुळे केंद्रातील हवा वर जाते वर गेल्यावर थंड हवेमुळे वाफेचे सांद्रीभवन होते
आणि पाऊस पडतो — यालाच आवर्त पाऊस म्हणतात

आवर्त पावसाची वैशिष्ट्ये:
- समशीतोष्ण कटिबंधात आवर्त पाऊस जास्त प्रमाणात आणि विस्तीर्ण क्षेत्रात पडतो
- उष्ण कटिबंधात आवर्ताचे क्षेत्र मर्यादित असते आणि पाऊस वादळी स्वरूपाचा असतो
- या पावसाची निश्चितता कमी असते कधी अतिवृष्टी होते, कधी पूर येतो तर कधी अवर्षण देखील होतो
जागतिक पर्जन्य वितरण :
जगभरात पावसाचे प्रमाण समान नसते. काही भागात भरपूर पाऊस पडतो, तर काही भागात फारच कमी.
जास्त पावसाचे भाग:
- विषुववृत्तीय प्रदेश – वर्षभर सूर्यकिरणे सरळ पडतात, त्यामुळे अभिसरण क्रिया होते
- आग्नेय आशिया – मोसमी वाऱ्यांमुळे भरपूर पाऊस
- वायव्य युरोप – समुद्राजवळ असल्यामुळे बाष्पयुक्त वारे पाऊस आणतात
कमी पावसाचे भाग:
- ध्रुवीय प्रदेश – थंड हवामान, बाष्प कमी
- वाळवंटी प्रदेश – उष्ण आणि कोरडे हवामान
- खंडांतर्गत भाग – समुद्रापासून दूर असल्यामुळे वारे बाष्प घेऊन पोहोचत नाहीत
- भारतीय द्वीपकल्पाचा मध्यभाग – सह्याद्रीच्या पर्जन्यछायेत असल्यामुळे कमी पाऊस
- आफ्रिकेचा पूर्व भाग – पर्वतांमुळे अभिसरण क्रिया अडते
- युरोपचा पूर्व भाग – अटलांटिक महासागरापासून दूर असल्यामुळे वारे पोहोचत नाहीत
मध्यम पावसाचे भाग:
- जास्त पावसाच्या प्रदेशालगतचे भाग
- समुद्रकिनाऱ्याजवळचे प्रदेश

(i) भारतीय द्वीपकल्पाच्या मध्यभागात पाऊस कमी असण्याची कारणे:
- भारतात पाऊस मोसमी वाऱ्यांमुळे पडतो. हे वारे पश्चिमेकडून येतात आणि सह्याद्री पर्वताला अडतात. त्यामुळे कोकण व सह्याद्रीच्या पश्चिम बाजूला भरपूर पाऊस पडतो.
- पूर्वेकडून येणारे वारे गारो-खासी टेकड्यांना अडतात आणि नंतर हिमालयाकडे वळतात.
वाऱ्यांच्या मार्गावर बंगालच्या उपसागरातील आवर्तांचा प्रभाव असतो. - जसजसे वारे किनारपट्टीपासून आतल्या भागात जातात, तसतसे त्यातील बाष्प कमी होते. म्हणूनच मध्य भारत हा दोन्ही किनाऱ्यांपासून दूर असल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी असते.
(ii) मध्य आफ्रिकेच्या पूर्व भागात पाऊस कमी असण्याची कारणे:
- आफ्रिकेच्या पूर्व भागात पर्वत आहेत, त्यामुळे तेथील तापमान तुलनेने कमी असते.
- विषुववृत्ताजवळ असूनही अभिसरण क्रिया योग्य प्रकारे घडत नाही.
- त्यामुळे वाफेचे सांद्रीभवन कमी होते आणि पाऊस कमी पडतो.
- म्हणूनच पूर्व आफ्रिका हा भाग विषुववृत्ताजवळ असूनही कोरडा असतो.
पावसावर परिणाम करणारे घटक:
- बाष्पाचे प्रमाण – जितकी वाफ, तितका पाऊस
- भूरचना – पर्वत, पठार, समुद्रकिनारे यांचा प्रभाव
- हवेचा दाब – कमी दाब असला की हवा वर जाते आणि पाऊस पडतो
- तापमान – गरम हवामानात बाष्पीभवन जास्त
- अक्षवृत्तीय स्थान – विषुववृत्ताजवळ पाऊस जास्त
पर्जन्यमापक :
पर्जन्यमापक म्हणजे पाऊस मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण
- यामध्ये नरसाळे (फनेल), बाटली आणि मोजपात्र असते
- हे उपकरण ३० सेमी उंच चौथऱ्यावर उघड्यावर ठेवले जाते
- जास्त पावसाच्या भागात दर तीन तासांनी मोजणी केली जाते
- पावसाचे प्रमाण मिलीमीटर किंवा लिटर प्रति चौरस मीटर या एककात मोजले जाते

| माहीती साठी :
१ मिमी पाऊस म्हणजे काय?
हिमवर्षा मोजण्याची पद्धत:
|
धुके, दव, दहिवर :
- भूपृष्ठाजवळ सांद्रीभवनाची क्रिया घडून आल्यास धुके, दव व दहिवर पाहायला मिळते.
- धुके : भूपृष्ठालगत सांद्रीभवनाची क्रिया घडून बाष्पाचे सूक्ष्म जलकणांत रूपांतर होते. हे सूक्ष्म जलकण हवेत तरंगतात. या सूक्ष्म जलकणांची घनता वाढल्यास धुके तयार होते.
- दव : बाष्पयुक्त हवेचा अतिथंड वस्तूंशी संपर्क आल्यास सांद्रीभवन क्रिया घडून थंड वस्तूच्या पृष्ठभागावर जलबिंदू जमतात/चिकटतात. पाण्याच्या या थेंबांना दव म्हणतात.
- दहिवर : हवेचे तापमान गोठणबिंदूच्याही खाली गेल्यास जमिनीलगतच्या बाष्पाचे संप्लवन क्रियेमुळे हिमकणांत रूपांतर होते, तसेच पृष्ठभागावर साचलेले दवही गोठते. भूपृष्ठाजवळच्या या हिमकणांस व गोठलेल्या दवास दहिवर म्हणतात.
- हिवाळ्यात धुके, दव व दहिवर जास्त प्रमाणात आढळतात.
वृष्टीचे परिणाम :
वृष्टीचे विविध परिणाम पुढीलप्रमाणे :
वृष्टीचे मुख्य फायदे:
- वृष्टीमुळे पृथ्वीवर पाणी उपलब्ध होते
- पावसामुळे नद्या, तलाव, विहिरी भरतात
- शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी मिळते
वृष्टीचे नकारात्मक परिणाम:
(१) अतिवृष्टी:
- पूर व महापूर येतात
- ओला दुष्काळ निर्माण होतो
- जीवित व वित्तहानी होते
(२) कमी वृष्टी:
- अवर्षण म्हणजे कोरड्या दुष्काळाची स्थिती
- पाण्याची टंचाई, जनावरांना चारा मिळत नाही
- शेतीचे नुकसान, अन्नधान्याची कमतरता
(३) अर्थव्यवस्थेवर परिणाम:
- भारत कृषिप्रधान देश असल्यामुळे पावसावर अवलंबून आहे
- अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची होते
- अन्नधान्य आयात करावी लागते
- देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो
धुके आणि दहिवराचे परिणाम:
- दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होते
- वाहतूक व्यवस्था (रेल्वे, रस्ते, विमान) विस्कळीत होते
- अपघात होण्याची शक्यता वाढते
- पिकांचे नुकसान, रोगराई पसरते
- काही पिकांसाठी दव उपयुक्त ठरते
आम्लपाऊस :
जेव्हा पावसाच्या पाण्यात आम्ल मिसळलेले असते, तेव्हा तो पाऊस आम्लपाऊस किंवा आम्लवर्षा म्हणतात.
प्रदूषणामुळे हवेतील विषारी वायू (जसे की सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड) वाफेशी रासायनिक क्रिया करतात. त्यामुळे सल्फ्युरिक आणि नायट्रिक आम्ले तयार होतात.
ही आम्ले पावसात मिसळून जमिनीवर पडतात — यालाच आम्लपाऊस म्हणतात.
आम्लपर्जन्याचे दुष्परिणाम:
- जलप्रदूषण होते
- मासे व जलचर प्राणी मरतात
- झाडांची पाने करपटतात, जळतात आणि गळून पडतात
- पशु-पक्ष्यांना हानी पोहोचते
- मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट होतात
- मृदा आम्लधर्मी होते आणि सुपीकता कमी होते
- इमारती, पूल, पुतळे यांचे रासायनिक झीज होते
- वाहतूक मार्ग आणि शहरातील संरचना खराब होतात
आम्लपाऊस हा मानवी क्रियाकलापांमुळे निर्माण होणारा पर्यावरणीय धोका आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण कमी करणे अत्यावश्यक आहे.
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-५-वृष्टी- नोट्स
PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-५-वृष्टी-स्वाध्याय प्रश्नोत्तरे
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (12 PDF) Rs. 53
Offer for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98
Main Page : – Maharashtra Board-Marathi Medium-इयत्ता ९ वी-भूगोल – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-४ : बाह्यप्रक्रिया भाग-२ – Online Notes
Next Chapter : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-६ : सागरजलाचे गुणधर्म– Online Notes
