Notes-Marathi Medium-इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-२-अंतर्गत हालचाली-Maharashtra Board

अंतर्गत हालचाली

इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-२-Maharashtra Board

नोट्स

अभ्यासघटक :

  • नैसर्गिक आपत्ती
  • भूपृष्ठांतर्गत हालचाली

 नैसर्गिक आपत्ती :

पृथ्वीवर काही वेळेस महापूर, वादळे, हिमवर्षाव, अतिवृष्टी, भूकंप, ज्वालामुखी यांसारख्या नैसर्गिक आपत्ती येतात.

भूकंप व ज्वालामुखी यांसारख्या नैसर्गिक आपत्ती भूपृष्ठांतर्गत हालचालींमुळे उद्भवतात. नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी होते.

भूपृष्ठांतर्गत हालचालींचे स्वरूप :

भूपृष्ठांतर्गत हालचाली या मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात.

प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थांतून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते.

ही ऊर्जा ऊर्जालहरींच्या स्वरूपात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात.

भूपृष्ठांतर्गत हालचालींचे वर्गीकरण :

भूपृष्ठांतर्गत हालचालींचे गती, दिशा व भूरूप यांवर आधारित पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते :

(i) गती आधारित भू-हालचाली :

  • मंद भू-हालचाली (सातत्याने होणाऱ्या) उदा., पर्वत व खंडांची निर्मिती.
  • शीघ्र भू-हालचाली (घटनेच्या स्वरूपात होणाऱ्या). उदा., भूकंप, ज्वालामुखी.

(ii) दिशा आधारित भू-हालचाली :

  • क्षितिज समांतर भू-हालचाली,
  • ऊर्ध्वगामी भू-हालचाली
  • अधोगामी भू-हालचाली.

(iii) भूरूप आधारित भू-हालचाली :

  • खंडजन्य भू-हालचाली (भूखंड, पठारे व उच्चभूमी निर्माण करणाऱ्या )
  • पर्वतजन्य भू-हालचाली. (वलीकरण, प्रस्तरभंग क्रिया)

स्पष्टीकरण :
  • ऊर्ध्वगामी भू-हालचाली : भूपृष्ठांतर्गत खालून वरच्या दिशेने होणाऱ्या ऊर्जालहरींच्या हालचाली, म्हणजे 'ऊर्ध्वगामी भू-हालचाली' होत.
  • अधोगामी भू -हालचाली : भूपृष्ठांतर्गत वरून खालच्या दिशेने होणाऱ्या ऊर्जालहरींच्या हालचाली, म्हणजे 'अधोगामी भू-हालचाली' होत.
  • विभंग किंवा प्रस्तरभंग : अंतर्गत हालचालींमुळे खडकांवर ताण पडल्याने खडकांना तडे पडतात, त्या तड्यांना 'विभंग किंवा प्रस्तरभंग' म्हणतात.

 

मंद भू-हालचाली :

मंद भू-हालचालींचे भूकवचावर पर्वतनिर्मिती व खंडनिर्मिती या स्वरूपांत परिणाम दिसून येतात.

(i) पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली :

पर्वत निर्माण करणाऱ्या हालचालींमध्ये वली पर्वत, गट पर्वत व खचदरी निर्माण करणाऱ्या हालचालींचा समावेश होतो.

  • वली पर्वत : अंतर्गत हालचालींमुळे क्षितिजसमांतर व एकमेकांच्या दिशेने जाणाऱ्या ऊर्जालहरी निर्माण होतात, तेव्हा मृदू खडकांच्या थरावर दाब पडून वळ्या निर्माण होतात. परिणामी पृष्ठभागाचा भाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते. उदा., हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स.

  • गट पर्वत : अंतर्गत हालचालींमुळे क्षितिजसमांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जालहरी निर्माण होतात, तेव्हा खडकांवर ताण निर्माण होऊन विभंग तयार होतात. अशाच प्रकारे कठीण खडकांमध्ये ऊर्जालहरी एकमेकांकडे आल्यानेही दाब पडून असे विभंग तयार होतात. दोन समांतर विभंगांमधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो, तेव्हा हा उचलला गेलेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो. असा भूभाग गट पर्वत म्हणून ओळखला जातो. उदा., युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार.

  • खचदरी : कधी कधी भूकवचावर ताण पडून समोरासमोर दोन तडे पडतात. त्या दोन तडांदरम्यानचा भूभाग खचतो. असा खचलेला खोलगट भूभाग म्हणजेच खचदरी होय. उदा., भारतातील नर्मदा नदीची खचदरी, आफ़रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली, युरोपमधील व्हाईन नदीची खचदरी.

(ii) खंड निर्माणकारी हालचाली :

मंद भू-हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्रसपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते.

अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांचीही निर्मिती होऊ शकते. मूळचा भूभाग खचला गेल्यास तो समुद्रसपाटीच्या खाली जातो. अशा वेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागरतळाचा भाग बनतो.

 

शीघ्र भू-हालचाली :

शीघ्र भू-हालचालींचे भूकंप व ज्वालामुखी या स्वरूपात परिणाम दिसून येतात.

(i) भूकंप : भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे होय.

भूपृष्ठाच्या अंतर्गत होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलिकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते व ऊर्जालहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते, म्हणजेच भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात भूकंपमापन यंत्राने मोजतात.

भूकंपाची कारणे :

  • भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण होणारा ताण.
  • भूपट्ट सरकणे.
  • भूपट्ट एकमेकांवर आदळणे.
  • भूपट्टे एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे.
  • भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे.
  • ज्वालामुखींचा उद्रेक होणे.

भूकंप नाभी व अपिकेंद्र : भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेचे उत्सर्जन ज्या ठिकाणाहून होते, त्या ठिकाणी भूकंप केंद्र असते. या केंद्रास

भूकंप नाभी म्हणतात.

ऊर्जालहरी भूपृष्ठावर जेथे सर्वांत प्रथम पोहोचतात, अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंपनाभीशी लंबरूप असते.

भूकंप लहरी :

भूकंप लहरींचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी असे पुढील तीन प्रकार होतात :

  • प्राथमिक लहरी (Primary or ‘P’ Waves) : भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या प्राथमिक किंवा 'P' लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या दिशेत सर्व दिशांनी भूपृष्ठात प्रवास करतात. या लहरींमुळे खडकातील कण पुढे-मागे सरकतात. घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू शकणारा या लहरींचा मात्र द्रवरूपातील गाभ्यामधून प्रवास करताना दिशेत बदल होतो.
  • दुय्यम लहरी (Secondary or ‘S’ Waves) : प्राथमिक लहर्रीनंतर भृपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा 'S' म्हटले जाते. या लहरींही नाभीकेंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. या लहरींमुळे खडकातील कण वर-खाली सरकतात, या लहरी फक्त घन पदार्थांतून प्रवास करतात. प्राथमिक लहरीपेक्षा दुय्यम लहरी या अधिक विध्वंसक असतात.
  • भूपृष्ठ लहरी (Surface or ‘L’ waves) : प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ किंवा 'L' लहरींची निर्मिती होते. या लहरी भूकवचात परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात.

भूकंपमापन यंत्र :

भूकंपमापन यंत्राद्वारे भूकंप लहरींचा आलेख काढता येतो. या आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता कळते. भूकंपमापन यंत्राद्वारे अतिसूक्ष्म लहरीदेखील मोजता येतात.

भूकंपाचे परिणाम :

  • जमिनीला तडे पडणे.
  • भूमिपात होऊन दरडी कोसळणे.
  • भूजलाचे मार्ग बदलणे.
  • काही प्रदेश उंचावले जाणे, तर काही प्रदेश खचणे.
  • सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होणे.
  • हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळणे.
  • प्रचंड प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होणे.
  • वाहतुकीचे मार्ग खंडित होणे.
  • संदेशवहन व्यवस्था कोलमडणे.

(ii) ज्वालामुखी :

पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप घटक भूपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया, म्हणजे 'ज्वालामुखीचा उद्रेक' होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रव स्वरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस असे म्हणतात.

उद्रेकानुसार ज्वालामुखीचे प्रकार : उद्रेकानुसार ज्वालामुखीचे केंद्रीय ज्वालामुखी व भेगीय ज्वालामुखी असे प्रकार पडतात.

  • केंद्रीय ज्वालामुखी : उद्रेकाच्या वेळी मोठ्या नलिकेसारख्या मार्गातून बाहेर पडणारा लाव्हारस म्हणजे केंद्रीय ज्वालामुखी होय. केंद्रीय ज्वालामुखींमुळे ज्वालामुखीय पर्वत तयार होतात. उदा., जपानमधील फुजियामा.

  • भेगीय ज्वालामुखी : उद्रेकाच्या वेळी अनेक तडांतून (भेगांतून) बाहेर पडणारा लाव्हारस म्हणजे भेगीय ज्वालामुखी होय. भेगीय ज्वालामुखीमुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. उदा., भारतातील दख्खनचे पठार.

उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखींचे प्रकार : उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखींचे पुढील तीन प्रकार पडतात :

  • जागृत ज्वालामुखी : ज्या ज्वालामुखीचा वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो, असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदा., भूमध्य सागरातील स्ट्रांबोली.
  • सुप्त/निद्रिस्त ज्वालामुखी : जो ज्वालामुखी काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, असा ज्वालामुखी म्हणजे सुप्त/निद्रिस्त ज्वालामुखी होय. उदा., भारतातील बॅरन बेट.
  • मृत ज्वालामुखी : ज्या ज्वालामुखीतून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, असा ज्वालामुखी म्हणजे मृत ज्वालामुखी होय. उदा., टांझानियातील किलीमांजारो.

ज्वालामुखीचे परिणाम :

  • जीवित व वित्तहानी होते.
  • त्सुनामी लाटा निर्माण होतात.
  • ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूळ, धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घ काळ वातावरणात राहतात, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते.
  • ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते.
  • लाव्हा रसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात.
  • ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते.
  • मृत ज्वालामुखींच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात.

भूपट्ट सीमांचा भूकंपक्षेत्र व ज्वालामुखीक्षेत्र यांच्याशी असणारा थेट संबंध :

  • बहुतेक भूकंपक्षेत्रांचा व ज्वालामुखीक्षेत्रांचा विस्तार हा भूपट्टांच्या सीमावर्ती भागात दिसून येतो.
  • भूपट्ट सीमांच्या ज्या भागात भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो, त्या ठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावत असतो. अशा सीमांना भूपट्टऱ्हास सीमा म्हणतात.
  • ज्या भूपट्ट सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकारास येत असतात, अशा सीमांना भूपृष्ठनिर्मिती सीमा म्हणतात. या दोन्ही क्रिया भूकवचात सतत सुरू असतात.
 माहीतीसाठी :

भूपट्ट : प्रावरणावर तरंगणारे भूकवचाचे विशाल व अतिविशाल भाग/तुकडे म्हणजे 'भूपट्ट' होत.

  • भारत-ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरेशिया, उत्तर अमेरिका, दक्षि ण अमेरिका, पॅसिफिक व अंटार्क्टिका हे सात प्रमुख भूपट्ट आहेत.
  • पृथ्वीचे कवच अशा भूपट्टांनी तयार झालेले आहे. या भूपट्टांवर खंड व महासागर पसरले आहेत.
  • पृथ्वीच्या प्रावरणात निर्माण होणाऱ्या दाब व ताणांनुसार हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशेने सरकत असतात.

 

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-२-अंतर्गत हालचाली- नोट्स

PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-२-अंतर्गत हालचाली-स्वाध्याय प्रश्नोत्तरे


महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (12 PDF) Rs. 53

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (12 PDF) Rs. 51

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (24 PDF) Rs. 86

Offer  for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (56 PDF)-Rs.182

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *