वितरणाचे नकाशे
इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-१-Maharashtra Board
नोट्स
|
अभ्यासघटक :
|
नकाशे :
नकाशांचा उद्देश : नकाशांचा उद्देश प्रामुख्याने ठिकाणाचे स्थान व चलांचे (घटकांचे) भौगोलिक वितरण दाखवणे हा असतो.
उद्देशात्मक नकाशे : विशिष्ट उद्देशाने तयार केल्या गेलेल्या नकाशांना उद्देशात्मक नकाशे म्हणतात. म्हणजे एखाद्या विषयातील संकल्पना व त्यांच्यातील संबंध सुसंगत पद्धतीने नकाशाच्या स्वरूपात मांडणे.
वितरणाचे नकाशे :
- एखाद्या प्रदेशातील पर्जन्य, तापमान, लोकसंख्या इत्यादी चलांचे (घटकांचे) भौगोलिक वितरण दर्शवणारे उद्देशात्मक नकाशे, म्हणजे 'वितरणाचे नकाशे' होत.
- वितरण नकाशांतून एखाद्या प्रदेशातील विशिष्ट घटकांच्या भौगोलिक वितरणाचा आकृतिबंध सहजपणे लक्षात येतो.
नकाशातील भौगोलिक वितरण दर्शवण्याच्या तीन पद्धती :
(१) टिंब पद्धत :
या पद्धतीत, नकाशावर टिंब (dots) लावून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवले जाते.

- टिंब पद्धतीचे नकाशे तयार करताना केवळ गणितीय माहितीचा वापर करून एखाद्या भौगोलिक घटकाचे वितरण दर्शवले जाते.
- घटकाच्या वितरणानुसार टिंबे दिली जातात आणि प्रत्येक टिंबाचे मूल्य निश्चित असते.
- त्यासाठी प्रदेशातील घटकांच्या सांख्यिकीय माहितीचे कमीत कमी मूल्य व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतले जाते.
- टिंबांचे मूल्य ठरवताना टिंबांचे आकारमान, घटकांची घनता व नकाशाचे प्रमाण या बाबींचा विचार केला जातो. विशिष्ट मूल्य दाखवणाऱ्या प्रत्येक टिंबाचा आकार सारखाच ठेवला जातो.
- प्रदेशाची प्राकृतिक रचना, जलस्रोत, वाहतूक व्यवस्था इत्यादी घटकांचे वितरण विचारात घेऊन त्यानुसार टिंबे दिली जातात. जो घटक एखाद्या प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो, (उदा., लोकसंख्या, जनावरांची संख्या) अशा घटकांचे वितरण दर्शवण्यासाठी टिंब पद्धत अधिक सोईस्कर ठरते.
(२) क्षेत्रघनी पद्धत :
- या पद्धतीत नकाशावर विविध रंगछटा किंवा कृष्णधवल छाया (shades) वापरून भौगोलिक घटकांची घनता (density) वा अंश (magnitude) दर्शवली जाते.

- घटकाच्या किमान व कमाल मूल्यांनुसार ५ ते ७ मूल्यवर्ग तयार केले जातात.
- प्रत्येक वर्गासाठी विशिष्ट रंगछटा वापरली जाते, जी मूल्यवाढीनुसार गडद होत जाते.
- या पद्धतीत प्रत्येक उपविभागासाठी एकच मूल्य गृहीत धरले जाते व त्यानुसार उपविभागवार घटकांचे वितरण दाखवले जाते.
- उदाहरण:लोकसंख्येची घनता, पर्जन्यमान, शेतीचे क्षेत्रफळ इत्यादी
(३) समघनी पद्धत :
- या पद्धतीत, नकाशावर विषयाच्या सलग (continuous) वितरणासाठी रेषा (lines) वापरल्या जातात. या रेषांना "समरेषा" (isopleths) म्हणतात.

- समघनी पद्धतीचा वापर सलग वितरण असलेल्या घटकांसाठी (उदा. उंची, तापमान, पर्जन्य) केला जातो.
- या नकाशांसाठी घटकांची अचूक सांख्यिकीय माहिती घेऊन त्याचे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेऊन वर्गांतर ठरवले जाते.
- समान मूल्य असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषा म्हणजे सममूल्य रेषा होत. या रेषांच्या अंतरावरून घटकातील बदलाची तीव्रता समजते.
- समघनी नकाशांद्वारे नैसर्गिक घटकांचे वितरण व त्यातील कल स्पष्टपणे समजतो.
भौगोलिक क्षेत्रभेट :
- क्षेत्रभेटीचा उद्देश : या भूगोलातील अभ्यासपद्धतीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा व घटकांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो व मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेता येतो.
- क्षेत्रभेटीची पूर्वतयारी : क्षेत्रभेटीच्या पूर्वतयारीत क्षेत्रभेटीचे ठिकाण व क्षेत्रभेटीचा हेतू निश्चित करणे, क्षेत्राच्या नकाशांचा अभ्यास करणे, प्रश्नावली तयार करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो.
- क्षेत्राची निवड : क्षेत्रभेटीच्या क्षेत्राची निवड करताना स्थानिक परिस्थितीची माहिती घेणे व आवश्यक ती परवानगीपत्रे घेणे गरजेचे असते.
- क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्य : क्षेत्रभेटीसाठी नोंदवही, नमुना प्रश्नावली, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, टेप, होकायंत्र, नमुना गोळा करण्यासाठी कागद / प्लास्टिक पिशवी, नकाशा, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी साहित्य (वस्तू) बरोबर घेणे उपयुक्त ठरते.
- क्षेत्रभेटीच्या वेळी घ्यायची काळजी : क्षेत्र भेटीसाठी जाताना स्वतःची व इतरांची सुरक्षितता पाहणे आवश्यक आहे. क्षेत्रभेटीच्या वेळी शिक्षकांच्या सर्व सूचनांचे पालन करणे, क्षेत्रभेटीदरम्यान पर्यावरणाचे नुकसान न करणे, प्रथमोपचार पेटी बरोबर ठेवणे इत्यादी स्वरूपाची काळजी घेणे अत्यावश्यक ठरते.
अहवाल लेखन :
क्षेत्रभेट पूर्ण झाल्यावर प्राप्त झालेली माहिती व माहितीशी संबंधित छायाचित्रे यांच्या आधारे अहवाल लेखन करणे उपयुक्त ठरते. अहवाल लेखन करताना
- प्रस्तावना
- स्थान व मार्ग नकाशा
- प्राकृतिक घटक
- हवामान
- लोकसंख्या
- पर्या वरणीय समस्या व उपाय
- भूमी-उपयोजन
- निष्कर्ष
इत्यादी मुद्द्यांचा वापर करावा.
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-१-वितरणाचे नकाशे- नोट्स
PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-१-वितरणाचे नकाशे-स्वाध्याय प्रश्नोत्तरे
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (12 PDF) Rs. 53
Offer for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98
Main Page : – Maharashtra Board-Marathi Medium-इयत्ता ९ वी-भूगोल – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Next Chapter : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ- २ : अंतर्गत हालचाली– Online Notes
